औरंगाबाद- पंचवार्षिक निवडणुकीच्या देशात आता केवळ 'सरतं वरिस कामाचं' असाच प्रघात पडला आहे. सरकारी यंत्रणेला कामाला लावून अखेरच्या वर्षात मतदारांवर प्रभाव टाकण्याची युक्ती प्रत्येक सरकार वापरते आहे. शहराच्या विकास कामांना तीन-चार वर्ष खीळ घातल्यानंतर आता उद्घाटनाचा धडाका लागला आहे. दरम्यान, खैरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सेनेने कंबर कसली आहे. सरकारांचे काम कसे आहे, याचा प्रत्यय नेहमीच येतो. पहिले वर्ष निवडणुकांचे, दुसरे आरोप-प्रत्यारोपाचे तिसरे वर्ष नियोजनाचे चौथे अन शेवटचे वर्ष उद्घाटन समारंभाचे असाच एकंदर प्रकार सुरू आहे. केंद्रातले मोदी सरकार असो राज्य सरकार अथवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद अथवा महानगरपालिकेतील सत्ताधारी लोक हा कित्ता बरोबर गिरवतात.
जनतेला निव्वळ मतदानापुरतेच कळते असा या लोकांचा समज आहे. शहरातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, शहर बस सेवा हे सगळे प्रकल्प गेल्या काही वर्षापासून थंड बस्त्यात पडले होते. रस्त्यांची अवस्था तर इतकी खराब की अर्ध्या औरंगाबादकरांना पाठीच्या अथवा कमरेच्या दुखण्याने बेजार केले. पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. जमिनीखाली गाडलेल्या पाईप लाईन खराब झाल्या आहेत. पुरेसे पाणी शहराला मिळेनासे झाले. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. नवीन वसाहतींना कित्येक वर्षात पाणीपुरवठ्याच्या योजना मिळालेल्या नाहीत. स्मार्ट सिटी प्रकल्प कासवगतीने सुरू आहे. या सर्व प्रश्नांकडे काही वर्षात दुर्लक्ष करण्यात आले. आता निवडणुकीचे वर्ष आले आणि सत्ताधारी जागे झाले. त्यांनी मानापमान नाट्य एवढे रंगले की वीट आला. विकास कामे करताना जणू आपण जनतेवर उपकार करीत आहोत या भावनेतून केली जात आहेत.
स्मार्ट सिटी
प्रकल्पातील बस सेवेचे उद्घाटन असो किंवा उद्याचा होणारा रस्ते उद्घाटनाचा
कार्यक्रम.
या कार्यक्रमाचा इतका विचका या
मंडळींनी करून ठेवला की जनतेला अक्षरशः उबग आला आहे. सेना-भाजपची नेते मंडळी किती क्षुल्लक विचार करतात याची
कल्पनाच न केलेली बरी ! हे आम्ही केले...
ते तुम्ही केले असे दाखविण्यात सारी शक्ती ही मंडळी खर्च करीत आहेत. शहरवासीयांना
या गोष्टी मुळीच इंट्रेस्ट नाही.
सत्ता दिल्यानंतर एकदिलाने काम करून जनतेला मूलभूत सुविधा वेळेत
आणि पुरेसा द्याव्यात एवढीच माफक अपेक्षा शहरवासीयांची असते. त्यातही वैयक्तिक
हेवेदावे, राजकीय दोषारोपण यांचे गणित मांडत
विकास कामांना खीळ घालणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. त्यामुळेच आदित्य ठाकरे
यांच्या हस्ते झाले स्मार्ट सिटी चे उद्घाटन जितके कंटाळवाणे ठरले तितकेच आता
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्त्यांचे होणारे उद्घाटनही तिरस्करणीय आणि उद्घाटन
तिरस्करणीय आणि कंटाळवाणेच आहे. निवडणुकीच्या वर्षात तुम्ही विकास कामांचा धडाका
लावता. कमी वेळेत कामे उरकून जनतेच्या पैशाची लूट अक्षरश लूट करता. या बाबी आता
लपून राहिलेल्या नाहीत. पाच वर्षे सत्ता उपभोगत अखेरच्या वर्षात नजरबंदी करण्याचे
हे प्रकार आता बंद व्हायला हवेत. कोणत्याही सरकारने प्रत्येक वर्षाचा लेखाजोखा
जनतेसमोर मांडायला हवा. सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्या वर्षात केलेले काम आणि
शेवटच्या वर्षापर्यंत दरवर्षी केलेले काम याचा हिशेब जनतेला द्यायला हवा. जनतेनेही
आता सजगपणे यांच्या सरत्या वर्षाच्या विकासाला न भुलता पाच वर्षाचा हिशेब मागावा,
त्यातच समाजाचे भले
आहे.
शिवसेना काढणार उट्टे-
शिवसेनेने सीटी बस सेवेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले
होते. हा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा याची पुरेपूर काळजी सेनेने घेतली होती.
मात्र या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खा चंद्रकांत खैरे
यांना चांगलेच सुनावले होते. आदित्य ठाकरेसमोर झालेला हा अपमान खैरे विसरलेले
नाहीत.
आता रस्ते भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरे असतील अशी
घोषणा महापौर नंदकुमार घोडेलेंनी केली आहे. सेनेच्या या पावित्र्याने भाजपमध्ये
कालवाकालव झाली नसेल तरच नवल ! खैरेंच्या अपमानाचा पुरेपूर बदला घेण्याचा चंगच
सेनेने बांधल्याचे दिसते.
त्यामुळे उद्याचा कार्यक्रमही गाजणार यात शंका नाही.